महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आज शहरभर अपूर्व उत्साह पाहायला मिळाला. शिवजयंतीनिमित्त क्रांती चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी आज जनसागर लोटला होता. शिवजयंती निमित्ताने भगवा ध्वज, महिला, तरुण, तरुणी यांच्यासह शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पेहरावात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अवघे शहर शिवमय झाल्याचे दिसून आले. आज सकाळपासून शहरातील विविध भागातून चार चाकी व दुचाकी वाहन रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत क्रांती चौकात दाखल होत होत्या. शिवप्रेमींच्या गर्दीने क्रांती चौक फुलला असल्याचे दिसत होते. औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने क्रांती चौकातील छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी आमदार सुभाष झांबड, महापौर नंदकुमार घोडेले, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष नामदेवराव पवार, औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. रवींद्र बनसोड पाटील, कार्याध्यक्ष मनोज पाटील, अनिल मानकापे, अनिकेत पवार, संदीप शेळके, हरीश शिंदे आदींची उपस्थिती होती. आर.आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहारध्यक्ष दत्ता भांगे आदींनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. क्रांती चौकात सूर्यभान स्पोर्टस अकॅडमीच्या सुमारे ६० कराटे प्रशिक्षणार्थीनी सहा प्रकारचे प्रात्यक्षिके सादर केली. यात लेझिम, पावली, नृत्य करत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत कराटेची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. उपस्थितांनीही त्यांना भरभरून दाद दिली. संपूर्ण शहरभरातून भगवे ध्वज फडकावत तसेच ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा गगनभेदी घोषणा देत दुचाकी रॅलीद्वारे युवकांचे जत्थे क्रांती चौकात अभिवादन करण्याकरिता दाखल होत होते.
व्यासपीठावरून शिवप्रेमींचे स्वागत
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अध्यक्ष गोपाळ चव्हाण, सुरेश डिडोरे, विष्णू परजणे, संदीप पाटील, ज्ञानेश्वर कणके, विजय नलावडे, महादेव चव्हाण, लक्ष्मण मोरे, योगेश सूर्यवंशी, धनाजी फड, बंटी परजणे यांनी उपस्थित बांधवांचे स्वागत केले. संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड, नीलेश शेलार, बाबासाहेब दाभाडे, राहुल भोसले, डॉ. आर. एस. पवार यांनी उपस्थित शिवप्रेमींचे स्वागत करून शिवचरित्र तसेच भारतीय संविधान भेट दिले. यावेळी मराठा सेवा संघाचे विभाग सचिव प्रा. दीपक पवार, सुभाष बागल यांची उपस्थिती होती. शिवस्वराज्य बहुजन पक्ष, छावा संघटना, शिवसंग्राम संघटनेच्या वतीनेही शिवप्रेमींचे स्वागत करण्यात आले. आर आर. पाटील फाउंडेशनच्या वतीने कुणाल वराळे यांच्या मराठी व हिंदी देशभक्तीपर तसेच शिवरायांच्या गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
घराघरात शिवजयंती...
शहरातील ठिकठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याबरोबरच आज घराघरात शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. उत्तमनगर येथील सारिका जगताप यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शिवपूजन केले. यावरी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त केले. शंतनु सोनटक्के यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
टॅक्सीचालक महंमद शब्बीर यांनी दिली शहिदांना श्रद्धांजली
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना यावेळी टॅक्सीचालक महंमद शब्बीर यांनी स्वतः कविता लिहून जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. ‘ए आतंकवादियो, भारत के जवानों का बलिदान जाया नही जायेगा... कब्र खोद के रखो, वक्त आने पे बक्षा नही जायेगा, ये हमारा वाद हैं’, अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचा निषेध व्यक्त केला. क्रांती चौक येथे महंमद शब्बीर यांची ही कविता प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत होती.
हेलिकॉप्टरमधून शिवरायांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी
शिवजयंतीनिमित्त आज सकाळी आर. आर. पाटील फाउंडेशनच्या वतीने शहरातील क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तसेच विविध ७० ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आल्याचे आर. आर. पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भांगे यांनी सांगितले.